Ubuntu-उबंटू

Spread the love

उबंटू

हाव समुद्राच्या पाण्यासारखी असते. समुद्राचे पाणी पिल्याने तहान भागत नाही. उलट त्या खाऱ्या पाण्याने तहान वाढतचं जाते.

तहान वाढली तसा मनुष्य पुन्हा जास्त पाणी पितो. शेवटी शरीरात मिठाचं प्रमाण प्रमाणाबाहेर वाढून मृत्यू होण्याचा धोका वाढतो. मग ही हाव पद, प्रतिष्ठा किंवा पैशाची असू शकते.

आज येथे हे नमूद करायचं कारण काय?

आज पैशामागे जग अधाशा सारखं धावत आहे आणि हा पैसा कमीत कमी कष्ट करून कसा मिळवता येईल याचा मनुष्य विचार करत आहे. राजकारणातून मिळणारा पैसा थोडा त्याच मार्गाचा. 

निवडणुकीत दहा लाख लावा पन्नास लाख काढा!  अर्थात ते पन्नास लाख किंवा कोटी हे शासनाकडून त्या त्या शहर किंवा गावासाठी निधी स्वरूपात देण्यात आलेले असतात. 

थोडक्यात गावातील इतर गोर-गरीब, दिन-दुबळ्यांच्या कल्याणासाठी, मूलभूत सुविधेसाठी आलेला निधी हा वरच्या वर लाटला जातो. मूठभर लोकांचे कल्याण होऊन संपूर्ण गाव, शहर किंवा देश आहे त्यापेक्षाही खंगुण जातो. 

हा प्रकार फक्त भारत देशात नाही तर जगातील इतर सर्व देशात कमी-जास्त प्रमाणात घडत असतो. स्वार्थी भौतिक सुखाच्या नादात मनुष्यचं मन एव्हड असंवेदनशील झालं की त्याला इतरांचा किंचितसा विचार करावयास वेळ नाही.

सर्व बाबतीत प्रगत, सुशिक्षित, नितीमत्तेची जान,सद्सदविवेक बुद्धी आणि सामाजिक जबाबदारीचे भान असूनही मनुष्यजात असा स्वार्थी विचार करत असेल तर मग शहरीकरणाचा लवलेश नसलेली हजारो मैल दूर वनात राहणारी आदिवासी जमात अशाच स्वार्थीवृत्तीची असेल का?

रानात वणवण भटकून मिळालेली कंद-मुळे, शिकार करून मिळालेलं मांस खातांना ते इतरांचा मुळीच विचार करत नसतील का?

हे जाणून घेण्यासाठी एका मानवशास्त्रीय वैज्ञानिकांनी एक भन्नाट प्रयोग करण्याचे ठरविले.

त्यासाठी त्याने आफ्रिकेच्या दूर वनात जेथे खूपच अप्रगत मनुष्य वस्ती आहे अशा जागेची निवड केली. तेथे गेल्यानंतर त्याला दहा उघडी-नागडी उनाड मुलं जँगली खेळ खेळताना दिसली.

मग या वैज्ञानिकाने थोड्या दूर एका झाडाच्या बुंध्याच्या सभोवताली गोलाकर अशी दहा फळ ठेवली.  आणि त्या दहा मुलांना ‘जो पहिला येईल त्याला सर्व फळे मिळतील तेंव्हा शिट्टी वाजल्यानंतर पळत जाऊन ती फळ घेण्याचा आदेश दिला’. 

वैज्ञानिकाला वाटलं की शिट्टी वाजल्यानंतर या पैकी एखादा मुलगा जोरात पुढे पळून हवे तितके फळ हातात घेऊन खात बसणार आणि मग इतरांना खायला काहीच मिळणार नाही, इतर उपाशी राहतील.

पण प्रत्येक्षात घडलं उलटंच. ती सर्व दहा मुलं थोडंही न पळता एकमेकांच्या हातात हात घालून शांतपणे हळू हळू त्या झाडा जवळ गेली. प्रत्येकांनी एक एक फळ हातात घेतलं आणि एक गोलाकार रिंगण करून एकमेकांना देत ती खाऊ लागली.

हा प्रकार बघून त्या वैज्ञानिकाला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. असं अनपेक्षित घडलचं कसं यावर त्याचा विश्वासच बसेना. म्हणून वैज्ञानिकाने त्या आदिवासी मुलांची मानसिकता जाणून घेण्याचं ठरवलं.

त्यावर मुलांनी सांगितलं की ‘आमच्या समूहात जे जे मिळतं ते सर्वांचं असतं, त्यावर सर्वांचा सारखाच अधिकार असतो’ इंग्रजीत यालाच ,’आय एम बीकॉझ वी आर’ असं म्हणतात.

उबंटू नावानी हे तत्त्वज्ञानाच उदाहरण प्रसिद्ध आहे. मग मनात विचार येतो- जर हाच प्रयोग शहरातील मुलासोबत केला असता तर?

सांगायचं तात्पर्य असं की, या जगात सर्वांसाठी सर्व मुबलक प्रमाणात आहे. पण प्रत्येक्षात  ५% हावरट उद्योजक आणि राजकारणी नेत्याकडे ९५% संपती एकवटलेली आहे. आणि ९५% लोकांकडे फक्त ५% संपती आहे. याला ‘संपत्तीची हाव’हे एकच कारण आहे.

राजकारण्यांच्या भ्रष्ट्राचाराबदल प्रसिद्ध वक्ते शिवखेरानी खूपच छान उदाहरण दिलं आहे.

एक भारतीय नेता काही कारणानिमित्त परदेशी जातो. तेथील मंत्री त्याची राहण्या, खाण्याची आणि मनोरंजनाची खूपच चांगली सोय करतो. न राहून आपला नेता त्याला विचारतो,’ एक साधे राजकारणी असून तुम्ही माझी एव्हडी सोय कशी केली?’

त्यावर तो मंत्री आपल्या नेत्यांना एका खिडकीजवळ घेऊन जातो. दूर एक पूल असतो त्याकडे बोट दाखवून तो आपल्या नेत्याला विचारतो, ‘ तो दूर पूल दिसतो का?’ 

हा नेता म्हणतो ‘हो दिसतो की’.  त्यावर तो परदेशी मंत्री म्हणतो,’ १०% मित्रा १०% ! 

काही वर्षानंतर तोच परदेशातील मंत्री भारतात येतो.

मग हा नेता परतफेड म्हणून त्याची खूपच सोयसाय करतो. भारावून जाऊन तो भारतीय नेत्यास ‘एव्हड जँगी स्वागत कसं करू शकतोस मित्रा?’

याचं कारण विचारतो. त्यावर आपला नेता त्या नेत्यास एका खिडकीतून बोट दाखवत विचारतो,’ तो पूल दिसतो का?’ परदेशीय मंत्री म्हणतो- ‘ नाही दिसतं’ . त्यावर आपला नेता म्हणतो,’१००% मित्रा १००% !’   मूळात तेथे पुलच नसतो.

मग कसा विकास होईल गाव, शहर आणि देशाचा.

एखाद्या लाकडाला किटाणू जसे आतून पोखरून पोकळ करतात तसा देश पोखरला जातो. गरज आहे थोडा विचार करण्याची, थोडी संवेदनशीलता जागृत करण्याची. तेंव्हाच नवा सूर्योदय होईल. सर्वसामन्याचा विकास होईल.

मग अशा वेळी प्यासा या चित्रपटातील गाण्याच्या ओळी आठवतात,

‘ये महलों, ये तख्तों ये ताजों की दुनिया ये इन्सां के दुश्मन
समाजों की दुनिया ये दौलत के भूखे रवाजों की दुनिया
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है?’

© प्रेम जैस्वालpremshjaiswal@gmail.com

Comment Time...!