Kami gun milvnarya vidyarthyancha wali kon – कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाली कोण…?

कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाली कोण
Spread the love

Kami gun milvnarya vidyarthyancha wali kon – कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाली कोण…?


‘सक्सेस हॅज मेनी फादर, फेल्युर इज अल्व्वेज ओर्फन’

भर उन्हाळ्यात घाम गाळत दिलेल्या एकूण सर्वच परीक्षेचे निकाल साधारण जूनमध्ये लागतात. आपल्याकडे हल्ली परीक्षेची कमी नाही.

पूर्वी परीक्षा म्हंटल तर दहावी किंवा बारावी बोर्डाची, आणि त्यामुळे या दोन्ही परीक्षेला अनन्यसाधारण महत्व होत आणि एक वलय होता.

जसजसे शिक्षण क्षेत्रात बदल होत गेले आणि स्पर्धा वाढली तसे नवनव्या परीक्षेचा जन्म झाला.

हल्ली दहावी, बारावी बोर्डाव्यतिरिक्त दहावी शिष्यवृत्ती, एनटीएसई, केव्हीपीआय, आरएमओ तसेच बारावीत एमएच-सीईटी, जेईई-मेन, जेईई-ऍडव्हान्स, बिटसॅट, नीट, जीपमार नाटासारख्या अनेक देशपातळीवरील स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात.

या सर्व परीक्षेची काठिण्यपातळी लक्षात घेता काही वर्षा आधीपासून विध्यार्थी या परीक्षेचा अभ्यास करत असतात.

काही अपवाद सोडले, तर या परीक्षेचा अभ्यास स्वतः हुन करणे विध्यार्थ्यांना जमत नाही म्हणून विध्यार्थी या परीक्षेत चांगल्या मार्कानी उत्तीर्ण होण्यासाठी कोचिंग क्लासेसचा आधार घेतात.


पूर्वी शाळेत शिक्षकांना एखादा विध्यार्थी एखाद्या विषयात कमजोर वाटला तर त्याकाळचे ‘गुरुजी’ त्याकडे खास लक्ष देऊन शाळेतच वेगळा वेळ देऊन शिकवायचे.


ह्या मागील शिक्षकाचा हेतू खूप प्रामाणिक होता. काही शिक्षक शाळेतच ‘एक्स्ट्रा क्लास’ घेऊन काही कमजोर विध्यार्थ्याचा विषय पक्का करून त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे. कालांतराने शाळेच्या वेळापत्रकात हे बसत नसल्यामुले शिक्षकांनी घरी क्लास घ्यायला सुरुवात केली. यातच अर्थकारण येऊन त्याचे रूपांतर पुढे ‘ट्युशन क्लास’ आणि नंतर भरमसाठ फी घेणाऱ्या ‘कोचिंग क्लास’ मध्ये झाले. सुरुवातीच्या काळात ट्युशनच्या ‘कुबड्या’ घेऊन चालणारा विध्यार्थी म्हणजे ‘ढ’ समजल्या जायचा. पण कालांतराने कमी मार्क मिळण्याची भिती तसेच शालेय शिक्षकाच्या हातातील ‘हातचे मार्क’ या भितीने सर्वच विध्यार्थ्याने कोचिंग लावायला सुरुवात केली आणि हे क्षेत्र भरभराटीस आलं.

आज मूलं जन्मल्यापासून दहावी, बारावी, सर्व पदव्यासहीत सर्व स्पर्धात्मक परीक्षेसाठी कोचिंग क्लास आपल्या जवळपास उपलब्ध आहेत. आपण रोज हया फोटो-जाहिराती वृत्तपत्रात बघतच असतो. जाहिरातीचा भरणा असलेल्या वर्तमानपत्रात अर्ध्याहुन जास्त जाहिराती ह्या कोचिंग क्लासेसच्या असतात. कधी कधी वाटते कि यास वृत्तमानपत्र म्हणावं कि जाहिरातपत्र! इतर संस्थेप्रमाणे वर्तमानपत्रालाही प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजे पीटीआय ने आखून दिलेली एक नियमावली आहे पण पैशाच्या बाजारात पीटीआयच्या नियमाला बगल देऊन सरळसरळ मोठमोठ्या जाहिराती पुढच्या पानावर छापल्या जातात. वेळप्रसंगी मुख्य बातमीला बाजूला किंवा छोटी बनवून, जॅकेट चढवून जाहीराती छापल्या जातात. संपूर्ण जगाला अक्कलेच डोज पाजणारा वृत्तपत्र म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्थंभाला स्वतःची नियमावली पाळणे मात्र जमत नाही, असो.

मूळ मुद्दा असा की आज कोणत्याही क्लासेसच्या जाहिरातीकडे जर आपण पाहिल तर लक्षात येईल कि त्यात परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या फक्त मेरिटवाल्या विध्यार्थ्याचेच छायाचित्र छापलेले आपल्याला दिसतील, का ? जर जास्त मार्कानीउत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्याचेच फोटो आणि सत्कार होत असतील तर कमी मार्कवाल्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? ते आपल्या जीवनात काहीच चांगलं करणार नाहीत का ? त्यांचा वाली कोण ? का एखादे कोचिंगक्लासवाले हे सांगत नाही की आमच्या कडे हे अमुक अमुक विध्यार्थी होते पण त्यांना हि परीक्षा काही जमली नाही पण ते इतर क्षेत्रात खूपकाही चांगले काम करू शकतात. काही वर्षापूर्वी आपल्याकडील वृत्तपत्रात फक्त मेरिटवाल्या विध्यार्थ्याचेच फोटो छापले जायचे. त्यांची मुलाखत घेतली जायची. त्यामुळे इतर विध्यार्थ्याचे खच्चीकरणं व्हायचे. विध्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊन नैराश्य, आत्महत्यासारखे प्रकार घडत असत. असे होऊ नये म्हणून शासनाने मेरिटलिस्ट छापण्यावरच बंदी आणली. आज कोणत्याही वृत्तपत्रात दहावी किंवा बारावीची मेरिटलीस्ट छापली जात नाही.

इतिहासातील धडे शिकूनच आपण वर्तमानातील वाटचाल करत असतो. मायक्रोसॉफ्टचे बिलगेटस् हे इतर विध्यार्थ्याप्रमाणे हुशार नव्हते पण आज जगातील सर्वोच्च विध्यापीठातील गुणवंत त्यांच्यासोबत काम करत आहेत. क्रिकेटचा सम्राट भारतरत्न सचिन तेंडुलकर इयत्ता आठवीत नापास झाला होता. सैराट सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे नागराज मंजुळे विपरीत परिस्थितीत लहानाचे मोठे झाले, दहावीत नापास झाले. अर्थात त्या काळच्या शाळा किंवा कोचिंग क्लासने बिलगेटस, सचिन आणि नागराज मंजुळे सारख्यांचे फोटो छापले नसतील, हार-तुरे देऊन सत्कार केला नसेल पण आज ही लोक यशाच्या एव्हडया उच्च शिखरावर पोहचली आहे की त्यांचा साधा ऑटोग्राफ मिळणे कठीण आहे. कदाचित चांगले १०० पैकी १०० गुण मिळवनारे ‘परीक्षार्थी’ बनण्यात ते नापास झाले असतील पण आज आवडीच्या क्षेत्रातील चांगले विद्यार्थी होऊन त्यांनी यश गाठलं आहे.

मुळात शासनमान्य शाळा, कॉलेज आणि खाजगी कोचिंगक्लास याच्या शिकवणीची पद्धत समजण्यात पालक गल्लत करतात. खोलात जाऊन विचार केला तर आपल्या लक्षात येईल की शाळा-महाविद्यालयातील शिक्षक हे त्यांच्या वर्गातील तळागाळातील विध्यार्थ्याकडेसुद्धा तेव्हढेच लक्ष देतात जेव्हढे लक्ष ते हुशार विध्यार्थ्याकडे देत असतात. शिक्षकांची ही प्रामाणिक इच्छा आणि जिद्द असते की त्यांनी शिकवलेला विषय हा वर्गातील सर्व स्तरावरील विध्यार्थ्यांना समजावा आणि सर्वांचे कल्याण व्हावे. कोणी एकच विध्यार्थी मेरिटमध्ये आणणे असा ‘ फोटो-जाहिरात आणि मार्केटिंग’ वाला हेतू त्यांचा नसतो. थोडक्यात जो विध्यार्थी बसलेला आहे त्याने उठून चालण्यासाठी तयार करणे, जो चालत आहे त्याची गती वाढवणे आणि जो गतीने चालत आहे त्याची गती वाढवणे असा शुद्ध हेतू असतो. त्यामुळे शाळेत एकूण सर्वच विद्यार्थ्यांची प्रगती होत असते. आणि कदाचित अधोगती झाली तरी शालेय शिक्षक तो आमचाच विध्यार्थी आहे असं म्हणायला लाजत नाही.

या उलट कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षकाच सर्व लक्ष हे पुढील बाकावर बसलेल्या दोन-तीन रांगेपर्यंत मर्यादित असत. कारण या रांगेमधील विद्यार्थीच पुढे क्लासेसला ‘रँक’ देणारे असतात आणि त्यांचेच ‘फोटो’ क्लासेसच्या बिजनेसच्या जाहिरातीसाठी उपयुक्त असतात. कोचिंग शिक्षकाचा पगारही त्या रँकनुसार वाढत असतो. हया पुढील बाकावरील हुशार विध्यार्थी म्हणजे कोचिंग क्लासच्या शिक्षकाच्या डोक्याला ताप नसतात, आणि त्यांना व्यवस्थित शिकवणे, शँका निरसरन करणे त्यांना भाग असते. या उलट मागील बाकावरील विध्यार्थी ज्यांचा विषय खूप कच्चा असतो असे विद्यार्थी म्हणजे कोचिंग क्लासेस शिक्षकांसाठी ताप असतात. अशा विध्यर्थ्याच्या खालच्या पातळीवर येऊन शिकवण्याइतका संयम सर्व क्लासेस शिक्षकात नसतो. त्यामुळे ते वाऱ्यावर सोडले जातात. अशा पद्धतीत पुढचे विध्यार्थी खूप पुढे जातात आणि मागचे खूप मागे. थोडक्यात पुढील बाकावरील विध्यार्थी म्हणजे लग्नातील ‘मानकरी’ सारखे असतात त्यांना दुःखवून चालत नाही. काही पुढील बाकावरील विध्यार्थी वगळता मागच्या विद्यार्थ्यांच्या फोटोची क्लासेसला गरज नसते. मग एकूण जेईईसाठी कोचिंग घेणारे २५०० विध्यार्थी आणि पात्र मात्र १५ असे प्रकार घडतात, मग उरलेल्या २४८५ विद्यार्थ्यांनी काय करावं एव्हढ साधं मार्गदर्शनही कोचिंगवाले करत नाहीत.

मग आपल्या जाहिरातीत जास्तीत जास्त गुणवत्ताधारक विध्यार्थ्याचे फोटो दिसावे म्हणून बरेच क्लासेसवाले वेगवेगळे उद्योग करत असतात. वेळप्रसंगी इतर क्लासेसच्या विध्यार्थ्यांना लाखो-करोडो रुपयाची ऑफर देऊन फोटो घेतले जातात. हा आमदार-खासदार फोडण्याचाच प्रकार असतो. किंवा बळेच मोठा धनादेश, हारतुरे आणि पेढे देऊन फोटो काढून घेतले जातात, असे अनेक प्रकार अलीकडे घडत आहेत. ‘रँक विकण्याचा घोडेबाजार’ कोटासारख्या कोचिंगक्लासच्या पंढरीस नवीन नाही. एकंदरीत पैशाच्या या खेळात सर्वांकडून पैसे उकळून फक्त काही विध्यार्थ्याच भलं होत असताना दिसत आहे. उदाहरण दयायच असल्यास, संपूर्ण भारतात जेईई परीक्षेमध्ये उत्तीर्ण विध्यार्त्याची एकूण संख्या ३९०० असेल तर या तुलनेत भारतातील सर्व कोचिंगच्या उत्तीर्ण विध्यार्थ्याच्या फोटो-संख्येची बेरीज हि ७००० पेक्षा जास्त असणार, कारण एकाच विद्यार्थ्यांचे फोटो आपल्याला विविध क्लासेसच्या जाहिरातीत तसेच होर्डिंगवर बघायला मिळतात. थोडक्यात म्हणायचे तर –

सक्सेस हॅज मेनी फादर
फेल्युर इज अल्वेज ओर्फन

एकंदरीत शैक्षणिक क्षेत्रात बदल घडवणे ही शासनाची जबाबदारी आहे. कालच वृत्तमानपत्रात आलेल्या बातमीनुसार येणाऱ्या शैक्षणिक वर्षात शिक्षण मंत्र्यांनी ११वी, १२वी विज्ञानशाखेत शिकणाऱ्या विध्यार्थ्यासाठी बायोमेट्रिक उपस्थिती आवश्यक केली आहे. ‘देर आये दुरुस्त आये’ प्रमाणे उशिरा का होत नाही पण हा एक आशेचा किरण दिसत आहे. कारण त्यामुळे सर्वसाधारण तसेच तळागाळातील विद्यार्थ्याला फायदाच होईल. कारण कोचिंग क्लासेसची फी सर्वांना परवडणारी नसते. मुलांसाठी वाटेल ते करणारे पालक वेळप्रसंगी मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून कर्ज काढतात आणि त्यांच्या हाती काही लागत नाही. महाविद्यालयातच दर्जेदार शिक्षण मिळाल्यास गरीब आणि सर्वांचा फायदाच होईल. ‘गुरु’ म्हणजे काय, त्यांची शिकवण्याची पद्धत माहित पडेल. महाविद्यालयातील फक्त शिक्षण नाही तर महाविध्यालयीन वातावरणाचे त्यांच्यावर संस्कार होतील जे आज होताना दिसत नाहीत. वार्षिक स्नेहसम्मेलन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन त्यांचं व्यक्तिमत्वही उजळेल. थोडक्यात फक्त हुशार मुलांचा कोचिंग क्लासचा बाजार कमी होईल.

फक्त गरज आहे सरकारी आदेश तंतोतंत लागू होण्याची. कारण आपल्याकडे पळवाट शोधणाऱ्या हुशार ‘बिरबल’ ची कमी नाही. उद्या चक्क महाविद्यालयातील बायोमेट्रिकच रिमोटने कोचिंग क्लासेसला जोडलेली आढळल्यास आश्चर्य वाटू नये. दिवसातून तीन वेळेसची बायोमॅट्रिक आवश्यक केल्यास त्यास संस्थाचालकापासून सर्वच स्तरातुन विरोध होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांशी सोयरसुतक नसलेल्या शिक्षकाचे श्रम वाढतील. मागील कितीतरी वर्षांपासून एकाच रुळावर चालणारी गाडी जेंव्हा पटरी बदलेल तेंव्हा थोडा खडखडाट होणे साहजिक आहे. त्यातल्या त्यात श्रीमंत पालक जे आपले पाल्य कोटासारख्या इतर ठिकाणी कोचिंगसाठी ठेवतात त्यांचाही या बदलास विरोध होईल, क्लासेसवाल्यांचीही वेळेची थोडी सर्कस होईल. पण महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने इमानेइतबारे शिकवल्यास सर्वच विषयाची कोचिंग लावण्याची गरज पडणार नाही आणि खरोखरच विद्यार्थ्यांचा फायदाच होईल. पण हा बदल होणे आवश्यक आहे.

शिक्षणातील ह्या बाबीस फक्त शासनास जबाबदार धरणे चूक होईल, पालकही तेव्हढेच जबाबदार आहेत. त्यांनाही आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे. पालकांनी इतर मुलांचे अनुकरण न करता वेगळी शाखा, क्षेत्र निवडावे कारण प्रत्येकाचा पालकाचा पाल्यामध्ये एक वेगळा टेलेन्ट असतोच. जाहिरातीतील मेरिटचे फोटो आणि आमिषाचा गळाला लागून पालक आणि विद्यार्थी नको ते क्लास लावतात आणि त्यांची शैक्षणिक प्रगती न होता आर्थिक नुकसान होते. गरज आहे त्यांनी आपल्या मुलांचा वेळीच कल ओळखण्याची आणि मेरिटचा अट्टाहास न करता पाल्याची एकूण खरी प्रगती ज्या क्षेत्रात होऊ शकते तेच क्षेत्र निवडण्याची आणि त्याच क्षेत्रात यशाचे शिखर गाठण्यास त्यास मदत करण्याची.

© प्रेम जैस्वाल,  premshjaiswal@gmail.com

Comment Time...!