मान-सन्मान मागून मिळत नसतो…

Spread the love

“मान-सन्मान मागून मिळत नसतो…”

©रवी निंबाळकर

डोक्यानं जरासा मंद परंतु एका पंडिताच्या घरी जन्म घेतलेल्या तरूणाला सारखं वाटायचं की आपल्याला सगळ्यांनी “शास्त्रीजी” म्हणून हाक मारावी. परंतु त्याच्या मुर्खपणामुळे सगळे त्याला चिडवत असत.
यामुळे कधी तो चिडत असे, तर कधी प्रचंड निराश होऊन एकटाच बसत असे. दिवसेंदिवस त्याचा चिडखोरपणा वाढतच चालला होता. त्याच्या या चिडचिडेपणाचा त्रास घरातील प्रत्येकांना होत होता.
हे पाहून त्या मंदबुद्धीच्या तरूणाचे वडील राजाच्या एका विद्वान सल्लागाराकडे गेले अन् आपल्या मुलाची सर्व परिस्थिती त्यांना सांगितली.
तेव्हा तो विद्वान सल्लागार म्हणाला, ” पंडीत जी, तुम्ही काही काळजी करु नका. मला तुमच्या मुलाची भेट घालून द्या, आणि बघा उद्या पासून तुमच्या मुलाची चिडखोर वृती कमी होईल अन् सगळेजण त्याला ‘शास्त्री जी’ या नावाने हाक सुध्दा मारतील.”
अन् खरंच दुसऱ्या दिवसापासून प्रत्येकजण त्या मंदबुद्धीच्या तरूणाला ‘शास्त्री जी… शास्त्री जी’ म्हणून हाक मारायला लागले. तो ही तरूण वरवर चिडायचा परंतु मनातून मात्र प्रचंड खुष व्हायचा.
याच खुशीत घरी आल्यावर अतिशय शांत आणि शहाण्या सारखा वागायचा.
तेव्हा त्याच्या वडिलांना आश्चर्य वाटले, हा चमत्कार कसा झाला तरी कसा? असा प्रश्न त्यांनी त्या विद्वानला विचारला, तेव्हा त्यांनी सांगितले की, “मी तुमच्या मुलाला भेटलो अन् सांगितले की, उद्या तुला काही मुलं, ओ शास्त्री जी … ओ शास्त्री जी, असं म्हणून हाक मारतील, तेव्हा तू त्यांच्यावर खोटं खोटं चिडल्यासारखं कर अन् बघ हळूहळू तुला सगळं शहर शास्त्री जी या नावाने हाक मारेल.”
“अन् त्याला भेटून आल्यावर काही लहान मुलांना सांगितले की, तो तरुण दिसला की त्याला ‘शास्त्री जी’ म्हणून हाक मारा, मग बघा कसा चिडतो तो!”
“मग काय ही मुलं त्याला शास्त्री जी, म्हणायची अन् त्यानं लटकंच रागवायचं. ही गंमत लहान मुलांतून मोठ्या पर्यंत गेली अन् मग प्रत्येक जण त्याला ‘शास्त्री जी… शास्त्री जी’ म्हणून चिडवायला लागला.” “आज सगळ्या शहरात शास्त्री जी, म्हटलं की तुमचाच पोरगा असं समजतात.’
आता पहा! हा तरुण त्याच्या बुद्धीमत्तेमुळे किंवा विद्वतेमुळे शास्त्रीजी नाही झाला तर त्याला गंमत म्हणून ‘शास्त्री जी’ य नावाने लोक चिडवू लागले, अन् तो शास्त्री जी झाला.
मुर्ख माणसाला अशा हेटाळणीयुक्त पदव्यांचाच भुषण फार वाटतं.
ते म्हणतात ना, ‘दोन हाणा पण बाजीराव म्हणा.’ तशी ही गत…
‘मला चांगला म्हणा… मला चांगला म्हणा,’ म्हणून कोणी चांगला होत नसतो.


हे पटवून देण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात,
रडोनिया मान |
कोण मागतां भूषण ||१||
‘अहो ! बघा, मी किती बुध्दीमान आहे, मी समाजासाठी कितीतरी काम करत असतो. यासाठी तुम्ही लोकांनी माझा सन्मान केला पाहिजे. तुम्ही, मी म्हणतोय तेच ऐकलं पाहिजे.’
असा मागून मान मिळवण्यात कसलं आलंय भुषण आणि कसला आलाय स्वाभिमान?
काही लोकं असतात पहा, एखाद्या कार्यक्रमाचा फोटो पेपरात छापून येणार म्हटलं की, फोटो काढण्याच्या वेळेला अगदी अशा जागेवर जाऊन उभा राहाण्याची धडपड करतात, की दुसऱ्या दिवशी पेपरमधील फोटोत हीच लोक स्पष्ट दिसतात.
अन् सगळीकडे मिरवतात बघा, माझा फोटो पेपरात आला, मीच तो कार्यक्रम आयोजित केला होता, बघा! समाजासाठी माझी किती तळमळ आहे. यासाठी मला एखादा “समाज भुषण पुरस्कार” मिळाला पाहिजे. असं म्हणत आपलीच जाहीरात आपणच करतात.
खरं पाहील तर याचं त्या कार्यक्रमात काडीच योगदान नसतं, फोटो काढण्या पुरते तेवढेच येतात.


देवे दिलें तरी गोड |
राहे रूचि आणि कोड ||२||
परमेश्वराने निर्माण केलेल्या या सुंदर विश्वात राहत असताना, समाजात वागत असताना गुण्यागोविंदाने रहावे. या निसर्गाशी एकरूप होऊन जावं.
सगळा अहंकार, मोह-माया, द्वेष, तिरस्कार आदी दुर्गुणांचा त्याग केला तर या साऱ्या विश्वाकडून आपसूकच आपलं कौतुक होईल.
अन्यथा उगाचच नसलेला मोठेपणा मिरवण्यात कसला आलाय तो स्वाभिमान.


लावितां लावणी |
विके भीके केज्या दानी ||३||
एखादा भिकारी पोटात भुकेचा डोंब उसळला आहे म्हणून चतकोर भाकरीच्या अपेक्षेने तो तुमच्या दारात उभा आहे.
त्याला भिक्षा द्यायची सोडून, तुम्ही त्याला सांगायला लागतात की, ‘बघ! माझा वाडा किती मोठा आहे, माझ्याकडे सातपिढ्याला पुरेल इतकी धनदौलत आहे, मला काही कमी नाही.’ असा बेगडी रूबाब त्या भिकाऱ्याला दाखविण्यात काही अर्थ आहे का?
तो बिचारा म्हणेल, ‘मालक तुम्ही खूप मोठे आहात, आणि आता आहात त्यापेक्षाही आणखीन श्रीमंत व्हाल! परंतु आता मला फक्त चतकोर भाकरी द्या ओ!’
असं तो काकुळतीला येऊन म्हणत असताना तुम्ही जर त्याला सांगायलात की, ‘अरे! चतकोर भाकरीचा तुकडा काय मागतोस! माझ्याकडे बघ!
शेकडो एकर जमीन आहे, त्याठिकाणी मी उद्या सकाळी जाऊन पेरणी करणार आहे. ते पेरणी केलेलं पीक दुपार पर्यंत जोमानं वाढेल आणि संध्याकाळं पर्यंत त्याची कापणी आणि मळणी होईल अन् मग मी तुला खंडीभर धान्य तुला देईन.’
‘हे असं असतं बघ आपलं काम, सगळं असं झटपट असतं.’
असला ढोंगी मोठेपणा मिरवणं म्हणजे शुद्ध मुर्खपणा आहे.


तुका म्हणे धीरा |
विण कैसा होतो हिरा ||४||
तुकाराम महाराज म्हणतात, ‘ अहो! जरा धीर धरा, थोडा तरी संयम बाळगा, उताविळपणा केल्यानं मोठेपणा प्राप्त होतं नसतो.
कोळशाच्या खाणीत जो प्रचंड उष्णता व दाब याचा त्रास सहन करतो त्याचेच रूपांतर हिऱ्यात होते. आणि असा जो असा त्रास सहन करू शकत नाही, तो शेवटी कोळसा म्हणूनच रहातो.
आणि तो कोळसा कितीही ओरडत राहिला की, मला राजमुकुटात स्थान द्या, मला सोन्याच्या कोंदणात बसवा, तरी त्याला त्याच्या लायकी नुसार चुलीतच जागा मिळते.
“हिरा होण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात.”
मान-सन्मान मागून मिळत नसतो तो मिळवण्यासाठी संयमाची आणि प्रामाणिकपणाची गरज असते.
राम कृष्ण हरी 🙏
यशश्री क्लासेस, उस्मानाबाद