बडा घर पोकळ वासा…

Spread the love

“बडा घर पोकळ वासा…”

©रवी निंबाळकर

घरात खायला तर काही नाही, परंतु ताटात चार – दोन पैशाचं आणलेलं तेल ओतायचं अन् तेच तेल हाताला चोळत भर चौकात यायचं अन् मिशावर ताव देत जोरात ढेकर द्यायची. ती ढेकर ऐकणाऱ्याला अन् मिशावर ताव देताना पाहाणाऱ्याला वाटवं की, ‘हा जणू काय आताच घरातून तूप – पोळीच जेवण करून आला आहे.’
खरं पाहायला गेलं तर, या ढेकर देणाऱ्याच्या पोटात भुकेचा डोंब उसळलेला असतो. घरात बायका-पोरं पाणी पिऊन दिवस ढकलत असतात परंतु अन् या पठ्ठयाचा रूबाब काही संपत नसतो.
रूपया कमवायची अक्कल तर नसते परंतु दुसऱ्याच्या जीवावर जगणाऱ्यांचा रूबाब तर असा काही असतो की जणू यानंच स्वत:च्या जीवावर मेहनत करून सगळं कमावलं आहे.
झकपक राहणं, मोठं-मोठं बोलणं, खानदानी श्रीमंत असल्याच्या तोऱ्यात राहणारा माणूस मात्र अतिशय खुज्या विचारांचा असतो.
अशा दिखाऊ व भपकेबाज वृत्ती बाबत संत तुकाराम म्हणतात…
अडचणींचें दार |
बाहेर माजी पैस फार ||१||
एखाद्यानं चांगलं मोठं घर बांधलं, मोठ्या मोठ्या खोल्या बांधल्या, घरासमोर ऐसपैस मोकळी जागा सोडली, पण घराचं ‘मुख्य प्रवेशद्वार’ खूपच लहान केल तर एवढ्या मोठ्या घराचा उपयोग तरी काय?
फक्त दाखविण्यासाठी धन दौलत खूप आहे. त्या दौलतीचा माज अंगावर जागोजागी दिसतो आहे, त्याचबरोबर त्या दौलतीचा माज ही क्षणाक्षणाला त्याच्या वागण्यातून जाणवतो.
कुणी अडचणीत आला तर रूपया देण्याचं धाडस अंगी नसणाऱ्या अशा या धनिकाच्या दिखाऊपणाचा उपयोग तरी काय?
म्हणजेच, घर खूप मोठं असून देखील त्या मोठ्या घरात कुणाला सहजासहजी प्रवेशच करता येत नसेल तर असल्या मोठ्या घराचा काय तो उपयोग?

काय करावें तें मौन्य |
दाही दिशा हिंडे मन ||२||
स्वत:ला ज्ञानी, विद्वान साधू म्हणवून घेणाऱ्यांने ‘मौन’ धारण केले.
परंतु, असं साधूच सोंग घेतलेल्या त्या व्यक्तीचे मन जर अतिशय घाणेरड्या विचारांनी भरलेलं असेल तर असं ‘मौन’ धारण करणाऱ्या उपयोग तरी काय?
वाईट अन् विकृत विचारांनी भरलेलं मन हे एकाजागी कधी स्थीर असूच शकत नाही. असं अस्थीर मन दाही दिशांना भटकत असतं.

बाहेर दावी वेश |
माजी वासनेचा लेश ||३||
साधूचा वेष धारण केलेला कोणी एकजण आपल्या प्रवचनातून किंवा कीर्तनातून अतिशय रसाळ वाणीच्या द्वारे आध्यात्माचे विचार सांगत आहे आणि या विचारांची भूरळ ऐकणाऱ्यांला पडत आहे.
परंतु, आध्यात्माच्या कथा सांगणाऱ्याचेच मन मात्र विषय वासनेने ओतप्रोत भरलं असेल तर अशा रसाळ वाणीचा अन् अशा साधूत्वाचा उपयोग तरी काय?
एखाद्याच्या मनामध्ये अहंकार, स्वार्थ, स्त्रीयां विषयींची आसक्ती, धन-संपत्तीचा मोह इत्यादी दुर्गुणांनी ओसंडून वाहत असेल तर अशांच्या माणूस म्हणून जगण्यात तरी काय अर्थ आहे?

नाहीं इंद्रियां दमन |
काय मांडिला दुकान ||४||
नित्यनेमाने पूजा पाठ करतो, न चुकता तिर्थक्षेत्री जातो, तोंडी तर नेहमीच देवाचच नाव, कुठला वार चुकवत नाही, नेहमी उपास-तापास करतो, परंतु स्व:ताच्या इंद्रियांवरती अजिबात ताबा नाही.
नेहमीच विषय वासनेची अपेक्षा मनी बाळगून रहातो.
असं परमार्थाचं दुकान थाटून आध्यात्माचा बाजार मांडण्याचा उपयोग तरी काय?

सारविलें निकें |
वरि माजीं अवघें फिकें ||५||
घराच्या भिंती पांढऱ्या मातीनं तर जमिन शेणानं चांगल्याप्रकारे सारवून घेतली आहे. अशा घरात डोकावून पाहाणाऱ्याला, पाहता क्षणी वाटेल, ‘वा! किती स्वच्छ घर आहे! किती टापटीप सारवून घेतलं आहे.’
पण वरवरतीच्या, सारवलेल्या भिंतीच्या आतील बाजूस पुर्वीची घाण तशीच असेल आणि त्याचीच दुर्गंधी साऱ्या घरभर पसरली असेल तर असं वरवरती सारवून घेण्यात अर्थ तरी काय आहे?
जमिनीचे पोपडे उडालेले असताना ते खरवडून न काढता त्यावरतीच वरवर शेण टाकून सारवून घेतलं असताना ते सुरुवातीलाच चांगलं दिसतं, पण एकदा का जमिन वाळून गेली की पुन्हा खालचे पोपडे वरती यायला लागतात.
असंच असतं वरवरतीचा दिखाऊपणा करणाऱ्याचं, सुरूवाती सुरूवातीला चांगले वाटतात पण जशी जशी वेळ निघून जाते तसं तसं त्याचे दुर्गुण दिसायला लागतात.

कांहीं न लगेचि हाती ||६||
तुकाराम महाराज म्हणतात की, ‘ सरतेशेवटी अशाप्रकारचा दिखाऊपणा करणाऱ्यांच्या हाती काहीच लागत नाही.’
‘इतरांना जे काही करायचे आहे, ते फक्त मलाच विचारून केलं पाहिजे.’ ‘सगळ्यांनी मलाच चांगलं म्हणलं पाहिजे.’ या साठी चमकोगिरी करणाऱ्या लोकांना ना कधी ‘यश’ मिळतं ना कधी यांची ‘प्रगती’ होते.
कोणत्याही गोष्टीचं ‘ज्ञान’ नाही परंतु ‘मी किती शहाणा आहे,’ असं दाखविण्याचा प्रयत्न करणारा माणूस निश्चितच कधी ना कधी उघडा पडतोच.
वरवरतीच्या भंपकपणा अन् दिखाऊपणाला काहीच किंमत नसते.
जे काही आहे ते अस्सल हवं आणि ते हृदयातूनच आलेलं हवं, तरच ते टिकतं ही अन् वाढतं ही…
राम कृष्ण हरी 🙏
यशश्री क्लासेस, उस्मानाबाद