पाऊस तिच्या नजरेतला….

Spread the love

पाऊस तिच्या नजरेतला….

©Nandini Nitesh Rajapurkar

 

काल पासून सलग तीन दिवस अवकाळी पाऊस येत होता… क्रिकेटच्या मॅच जोरात सुरू असल्याने नवरोजी संध्याकाळ पासून टी व्ही समोर ठाण मांडून बसलेले… त्यात लाईट ही जायचे अधून मधून…
त्याच्या सोबत गॅलरी मध्ये गरम गरम भजी खात तिने पावसाचा आनंद घेतला…
आज दुपारपासूनच पावसाला सुरूवात झालेली..
हळूहळू रिमझिम बरसणारा पाऊस कधी गारा सोबत घेवून कोसळू लागला कळलेही नाही…
लेक आधीच गॅलरी मध्ये येवून पावसात खेळत होता.
खेळत काय लोळला तो पूर्ण.. भिजून चिंब झालेला…
ती मस्त वाफाळता चहाचा कप घेवून बाहेरील गंमत बघत गॅलरीत उभी होती… खाली सगळीकडे सगळ्यांची पावसापासून वाचायला धावपळ सुरू होती .. कोणी वाळलेले कपडे दोरिवरून काढून घरात पळत होत…कोणी क्लास वरून येत येत दप्तर सांभाळून नेत होत…कोणी नवीन गाडीला कव्हर टाकून झाकत होत… तर कोणी नुकतच एका आडोशाला थांबून पाऊस थांबायची वाट बघत होत…
समोरच्या घरात एक युवती तिच्या मेहेंदी लावलेल्या हाताने चेहऱ्यावर येणाऱ्या खोडकर बटा काना मागे सारत तिच्या साजणासोबत लाजत लाजत गुजगोष्टी करत होती…
त्याच्याच बाजूला नुकतेच वडील वारुन १५ दिवस झालेला …चेहऱ्यावर तणाव घेऊन थांबलेला त्यांचा मुलगा उंबर्यावर हाताची घडी करून थांबलेला…
वडिलांच्या आठवणीत रमला असावा बहुदा… डोळ्यात आसवे तरळलेली तिला त्या अंतरावरून ही दिसले… तिने त्याला खूप वेळा पावसात भिजताना पाहिलेले… गल्लीतल्या लहान पोरा-टोरांना कागदाच्या बोटी करून वाहत्या पाण्यात सोडायला त्यानेच शिकवले होते.. पण आज त्यांचा लाडका दादा पावसात उतरला नव्हता म्हणून सगळी पोर ही दरवाज्यातच खोळंबली होती… प्रेम, माया म्हणतात ते हेच असाव बहुदा… !!!
पावसाचा जोर अजून वाढून ही एकही पोरग गारा उचलायला बाहेर निघाल नाही ह्याच त्याला खरच आश्चर्य वाटल… शर्टच्या बाहीला हलकेच डोळे पुसून
त्याने त्याचा एक हात हळूच बाहेर पावसाच्या सरी
झेलायला काढला…
हातावर गार गार सरी बरसु लागल्या…
डोळे बंद करून त्याने मनात पाऊस अनुभवला… मनही चिंब झाले असावे बहुदा..धूसर झालेल्या नजरेने त्याने हळूच पुढ्यात साठलेल्या डबक्यात पाय टाकला..
आणि क्षणांत सगळी चिल्लर पार्टी बाहेर धावत त्याच्या जवळ गोळा झाली… एका चिमुकल्याने त्याच्या लाडक्या दादाच बोट धरलं आणि सगळी जत्रा रस्त्यावर जमली…
सगळे घरातून खिडक्यातून डोकावून त्यांचं गारा वेचन अनुभवू लागले… सुखद अनुभव होता तो..
सगळ्यांच हसणं.. गारा वेचण्याचा तो आनंद.. जणू सगळे त्या लहान मुलांमधून अनुभवत होते….
हे सगळं न्याहाळण्यात तिचा चहा गार झाला…
तिच्या मुलाला पण खाली त्या सेने मध्ये खेळायला तिने पाठवले… तेवढ्यात सगळे आकाशात पाहू लागले… इंद्रधनुष्य आपले सप्तरंग घेऊन बहरले होते.. आणि त्याला पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू ही उमटले होते…!!😊

Comment Time...!