एलईडी ब्लब: खरचं वीजेचं बिल कमी करतो का ?

Spread the love

एलईडी ब्लब: खरचं वीजेचं बिल कमी करतो का ?

आजच्या धकाधकीच्या जीवनात मेहनतीनं कमावलेले चार पैसे मासिक खर्च, बिल आणि हप्ते भरण्यातच संपून जातात. दोन पैसे वाचवून महिन्याचे बजेट सांभाळतच  माणसाचं आयुष्य पुढं पुढं सरकत असतं. पेट्रोल, डिझेल, विजेचे दर, हॉस्पिटल खर्च, कर, शिक्षणाची फी कमी झालेल्या बातम्या ऐकिवात नसतात. त्यांचा आलेख चढताचं असतो. लाईटबिल हातात घेतेवेळेस मनात एक धाकधूकी असते. एक मोठा ‘शॉक’ देण्याची क्षमता त्या कागदात असते. क्वचित ते कमी आलं तर त्या सारखा सुखद क्षण नसतो.  आणि ते कमी यावं म्हणून आपण वाटेल ती बचत करत असतो. ह्या बचतीचा धागा पकडूनच विजेची उपकरणं बनवणाऱ्या कंपन्या जाहिरात करत असतात. हल्ली सगळीकडं एलईडी वापरून वीज बचत करा अशी चर्चा आहे. या सुरात सूर मिळवून शासनानेहि काही योजना चालविल्या आहेत. पण त्यामुळं पाहिजे तेव्हडा फरक होताना दिसत नाही. फक्त एलईडी ब्लब वापरून मोठी वीज बचत होणे हा गोड गैरसमझ आहे आणि तो दूर व्हावा त्यासाठी हा लेखप्रपंच.

‘एलईडी ब्लब एक बार, बिल कम आयेगा बार बार’
‘विजेची बचत करण्यासाठी एलईडी ब्लब वापरा’
‘एलईडी ब्लब काळाची गरज’
‘कट ऑफ युअर इलेक्ट्रिसिटी बिल !’
‘एनर्जी सेवडं, एनर्जी अर्नड’

एलईडी ब्लब विकणाऱ्या कंपन्यांच्या जाहिरातीत अशी ठळक टॅग लाईन असते. या सर्व वाक्याचा सरळ सरळ अर्थ असा होतो कि पारंपारिक ट्यूब, सीएफएल न वापरता तुम्ही एलईडी ब्लब वापरल्यानं विजेची बचत होते. यातं गैर असं काही नाही. एलईडी ब्लबला कमी वीज लागते, प्रकाश मात्र जास्त असतो. त्यामुळं २० वॉट सीएफएल ब्लबच्या ऐवजी आपण 9 वॉटचा एलईडी ब्लब वापरला तर तेव्हडाचं प्रकाश पडून आपले ११ वॉट वीजेची बचत होते. असे घरातील ७-८ ब्लब बदलले तर एकूण ८८ वॉट वीज बचत होईल, असं आपण मानतो.

पण एलईडी ब्लब वापरून प्रत्येक्षात किती बचत होते याचा एक ढोबळ हिशोब केला तर वेगळं चित्र तयार होईल. त्यासाठी ‘सॅम्पल’ म्हणून आपण एका मध्यमवर्गीय २ बीएचके फ्लॅटच उदाहरण घेऊ :
——————————————————————–
1 युनिट कसं मोजतात?
1000 वॉटच उपकरण 1 तास चालवलं तर 1 युनिट पडतं.
सूत्र:     [1000 w x h = 1 KWH = 1 युनिट ]
———————————————————————
या सूत्राने आपण सीएफएल ब्लबचे युनिट मोजूया :

पोर्च लाईट = 20 W x 11 तास = 220 Wh = 0.22
लिविंग रूम= 20 W x 6 तास  = 120 Wh = 0.12
किचन।      = 20 W x 6 तास = 120 Wh =  0.12
मा.बेडरूम = 20 W x 4 तास =    80 Wh =  0.08
चि. बेडरूम= 20 W x 8 तास =  160 Wh =  0.16
पॅसेज।       = 20 W x 6 तास = 120 Wh =  0.12
बाथरूम।    = 20 W x 2 तास =   40 Wh=   0.04
बाथरूम      = 20W x 2 तास =    40 Wh=   0.04
–   ———————
सीएफल ब्लब 24 तासाचे एकूण युनिट =         0.90
———————

म्हणजे 1 युनिटपेक्षाही कमी. पण आपल्या सोयीसाठी दररोज प्रकाशासाठी  आपण जास्तीत जास्त  1 युनिट विजेचा वापर करतो असं समजू. म्हणजे एका महिन्यात घरातील प्रकाशासाठी आपण 30 युनिट विजेचा वापर करतो. हे गणित झालं सीएफएलचं.

पण वीजबचत म्हणून जर वर वापरलेल्या 20 वॉट सीएफएलच्या जागी आपण 9 वॉटचे एलईडी ब्लब वापरले तर विजबचत होऊन महिन्याचा वापर 30 युनिटवरून 12 युनिटवर येईल. आणि आपली एकूण महिन्याचा वीजबचत 18 युनिट होईल. हे एका फ्लॅटसाठी. देशातील लाखो घराचा विचार केल्यास ही खूप मोठी वीज बचत आहे. एकंदरीत देशाच्या साधनसंपतीचा विचार केल्यास हि खूप मोठी ऊर्जाबचत आहे याबद्दल किंचितशी शंका नसावी. त्यामुळं एलईडी ब्लब वापरणे कधीही चांगले. सध्या सर्वत्र एलईडी ब्लब उपलब्ध आहेत. खपं प्रचंड वाढल्यामुळं त्याच्या किमतीत घसरण होऊन माफक किमतीत ते सर्वत्र उपलब्ध आहेत.  पण मूळ मुद्दा असा की हे ब्लब वापरूनसुद्धा विजेच्या बिलात लोकांना अपेक्षित फरक दिसत नाही. असं का ?

तर कारण असे :

आपल्या घरात आपण लाईटशिवाय इतर अनेक उपकरण वापरत असतो. जसेकी पंखा, टीव्ही, फ्रीज, कुलर, कंप्युटर, सीसीटीव्ही, लॅपटॉप, पाण्याची मोटर, गिझर, वॉशिंग मशीन, पिठाची चक्की, इलेक्ट्रिक प्रेस, ओव्हन, ड्रायर, एक्झॉस्ट फॅन, चार्जर इ. या उपकरणाला लागणाऱ्या विजेच्या तुलनेत एलईडी ब्लबला लागणारी वीज अगदी नगण्य असते.

उदाहरणार्थ बोअरची मोटर अर्धा तास चालवली तर महिन्याला  साधारण 50 युनिट वीज वापर होतो. त्यातच पाण्याची पातळी, इमारतीची उंची जेव्हडी जास्त तेव्हड बिल जास्त. थोडक्यात आपण वापरत असलेल्या प्रत्येक पाण्याच्या थेंबाला वीज लागते. थोडक्यात :

जास्त पाणी वापर म्हणजे जास्त वीज बिल.
जास्त मोबाईल वापर म्हणजे जास्त बिल,
जास्त कंप्युटर, लॅपटॉप वापर म्हणजे…
जास्त कपडे धुणे, झाडाला पाणी म्हणजे ……
जास्त सदस्य, जास्त पाहुणे म्हणजेच…..
जास्त कपड्याची इस्त्री म्हणजे …..
जास्त सिरीयल पाहिल्या म्हणजे …..
जास्त वेळ आंघोळ म्हणजेच ……
जास्त वेळ एसीचं सुख म्हणजेचं……
वरची टाकी भरून वाहते म्हणजेच पाणी आणि वीज दोन्ही वाया गेले ! म्हणजेच जास्त बिल असं समजावे.

वॉशिंग मशीन, फॅन, पिठाची घरगुती चक्की, ड्रायर हे गोलगोल फिरणारे उपकरण खूपचं वीज ओढत असतात. तसेच वीज ओढण्यात पाणी तापवण्याचा गिझरचा पहिला नंबर लागतो. रोज अर्धा तास गिझर चालत असेल तर महिन्याला 45 युनिट वीज खातो. या तुलनेत एलईडी ब्लबचं युनिट काहीच नाही.  कारण गिझर हा 3000 वॉटचा असतो. म्हणजे एक गिझर चालू ठेवणे म्हणजे 9 वॉटचे  333 एलईडी ब्लब चालू ठेवण्यासारखा प्रकार!

त्यामुळं एलईडी ब्लब चुकीन काही तास चालू राहिला तर विशेष काही फरक पडणार नाही पण वरील सर्व उपकरने काही मिनिटे/सेकंड जरी जास्त वापरली तर वीजबिलात खूप फरक पडतो. वीज बिल जास्त येतो.

खरचं विजेचं बिल कमी करायचं असेल तर वर नमूद केलेल्या सर्व विजेच्या उपकरणाचा वापर कमीत कमी करने आवश्यक आहे.  घरातील लाईट-फिटिंग तसेच योग्य अर्थिंग असणे आवश्यक आहे. त्यासोबतच मोटारपंप, एसी, पंखे, फ्रीज सारख्या उपकरणाची नियमित दुरुस्ती, देखभाल करणे आवश्यक आहे. अधून मधून हे उपकरण घेत असलेलं करंट इलेक्ट्रिशियनकरवी चेक करून घ्याव. सतत पाण्यात राहून क्षारमुळे बोअरचा पंप जाम होतो आणि प्रचंड विद्युत खातो. त्यामुळे बोअरच्या स्टार्टरबोर्ड वर करंटमीटर असतो त्याकडे नियमित लक्ष असावे. करंटमीटर नेहमीपेक्षा जास्त दाखवतं असेल तर पंप दुरुस्त करून घ्यावा.

मनुष्याच्या भौतिकसुखाला अंत नाही. मानवी जीवन सुसह्य व्हावं म्हणून बाजारात नवनवीन उपकरण येत आहेत. बऱ्याच उपकरणात रिमोट कंट्रोल असतंच. रोज नवीन  डिस्काउंट-ऑफर देऊन विजेच्या उपकरणाच्या जाहिराती आपल्याला भुरळ घालत असतात.  उपकरण जरी अर्ध्या किमतीत मिळत असलं तरी न चुकता येणाऱ्या विजबिलात डिस्काउंट हा प्रकार नसतो. पिठाची चक्की, बार्बेक्यू असे काही उपकरण आहेत की ज्याचा वापर आपण क्वचितच करतो. पण ती उपकरण घरातील जागा व्यापतात शिवाय वीजबिल वाढवतात. त्याच प्रमाणे नवीन उपकरण घेताना ते खरोखरचं आवश्यक आहे का याचा सद्सदविवेक बुद्धीनं विचार करावा. तसेच ते उपकरण किती वीज खातं हे त्याच्या ‘स्टार रेटिंग’ वरून लक्षात घ्यावे. ‘पाच स्टार रेटिंग’ म्हणजे सर्वात कमी वीज घेणार उपकरण. कारण विजेचे भावाचा आलेख हा चढताचं असतो. नवीन घर, फ्लॅट किंवा ऑफिस घेताना त्या वास्तूतं खेळती हवा, योग्य प्रकाशयोजना आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. इन्व्हर्टर, मोबाईल, लॅपटॉप, टॅबच्या बॅटरी जुन्या झाल्यास त्या खूप करंट ओढतात आणि वीज बिल वाढतं. इन्व्हर्टर तर चार्जिंगसाठी  100% वीज घेऊन परतीत वीज गेल्यानंतर 75%  वीज देतं. 25% वीज स्वतः खातो.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विजेचे आकार. विद्युत महामंडळाने विजेच्या वापराचे स्लॅब ठरवून दिले आहेत. म्हणजे 100 युनिट पेक्षा कमी युनिटसाठी कमी आकार, 100 युनिट पेक्षा जास्त युनिटसाठी जास्त आकार. आणि 300 युनिटपेक्षा जास्त युनिटसाठी खूप जास्त भावाने वीज आकारली जाते. त्यामुळे जेव्हडा विजेचा वापर कमी तेव्हड बिल कमी.

शेवटी कंजुशी आणि काटकसर यामधील फरक समजणे आवश्यक. बरीच मंडळी ह्या दोन शब्दातील फरक समजण्यात चूक करतात. वीज असतानाही अंधारात बसणे हि कंजुशी. गरज पडेल तेंव्हाच लाईट-पंखा चालवणे हि चांगली काटकसर. पण गरज नसताना घरातील अनावश्यक लाईट पंखे चालू ठेवणे हा निवळ निष्काळजीपणा. विजेची बचत हा एक संस्काराचाच भाग आहे. अन्न, पाणी असो की वीज त्याची बचत कशी करावी याचे संस्कार प्रत्येक घराघरात तसेच शालेय शिक्षणात होणे आवश्यक आहे. किंबहुना शालेय शिक्षणात त्याचा अंतर्भाव व्हायलाचं पाहिजे. वीज बचतीसाठी घरातील वरिष्ठ पालक मंडळी जबाबदार असतात. कारण हे संस्कार वरूनचं खाली झिरपत येत असतात.  त्यामुळे इतर जीवनोपयोगी मूल्यासोबत अन्न, पाणी, पैसा आणि वीज बचत करण्याचे अमूल्य संस्कार आणि शिकवणं वरिष्ठाने कनिष्ठाला देऊन देशाच्या साधनसंपत्तीचे संवर्धन करण्यात अमूल्य हातभार लावावा. ती एक प्रकारची देशसेवाच होईल.

© प्रेम जैस्वाल premshjaiswal@gmail.com

2 Replies to “एलईडी ब्लब: खरचं वीजेचं बिल कमी करतो का ?

Comment Time...!