असंगाशी संग प्राणाशी गाठ…

Spread the love

“असंगाशी संग प्राणाशी गाठ…”

©रवी निंबाळकर

एका झाडावर एक हंस त्याच्या परिवारासह अतिशय सुखा समाधानाने राहत असतो. हंसाच्या परिवाराचं हे समाधानी जीवन शेजारच्या झाडावर घरटं करून राहणाऱ्या कावळ्याला अन् त्याच्या बायकोला अजिबात बघवत नसे.
या हंसाला अन् त्याच्या परिवाराला कायमचं संपवून टाकायचं, असा विचार नेहमीच तो कावळा करत असतो. पण त्याला तशी संधी मिळत नाही, हे लक्षात आल्यावर तो हंसाच्या परिवारासोबत मैत्रीचे संबंध वाढविण्याचा प्रयत्न करतो.
त्याच ते गोड बोलणं, घरी काही खायला आणलं असेल तर हंसाच्या परिवाराला आणून देणं, असं करत करत त्या कावळ्याने हंसाचे मन जिंकले.
परंतु कावळ्याचा आपल्याशी मैत्री करण्याचा हेतू काही चांगला नाही, हे हंसाच्या बायकोच्या लक्षात आले. आणि तिने आपल्या नवऱ्याला म्हणजे हंसाला सावध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा हंस म्हणाला, ‘ तुझं आपलं काहीतरीच असतयं बघ!
तो कावळा अन् त्याची बायको आपल्याशी किती चांगलं वागत आहेत अन् तू मात्र उगाचच शंका घेत आहेस.’ असं म्हणून त्यांने आपल्या बायकोलाच वेडं ठरवलं अन् तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.
एक दिवस भर दुपारच्या वेळी झाडाची थंडगार व गडद सावली बघून एक शिकारी त्याच झाडाखाली झोपी गेला. परंतु झाडाच्या फांद्यातून येणाऱ्या सुर्यकिरणां मुळे त्याची झोपमोड होऊ लागली.
तेव्हा हंसाने आपले दोन्ही पंख पसरून त्या शिकाऱ्याच्या चेहऱ्यावर सावली केली.
त्या शिकाऱ्याची होणारी झोपमोड अन् त्याला सावली देण्याची हंसाची धगपड लांबूनच कावळा बघत असतो.
तो हळूच हंसाच्या जवळ येतो अन् नेहमी प्रमाणे त्याच्याशी गोड गोड बोलत राहतो. अन् अचानकपणे झोपलेल्या शिकाऱ्याच्या तोंडावर ‘शी’ करून लांब उडून जातो.
थकून भागून झोपी गेलेला शिकाऱ्याची झोपमोड तर झालीच पण तोंडावर घाण ही पडली यामुळे तो चांगलाच चिडतो अन् वर बघतो तर त्याला पंख पसरून थांबलेला हंस दिसतो.
त्यांने मागचा पुढचा विचार न करता शेजारी ठेवलेली बंदुक उचलतो अन् नेम धरून त्या हंसाचा वेध घेतो. गोळी लागून रक्तबंबाळ झालेला हंस तडफडत खाली पडतो अन् पुटपुटतो की,” कावळ्याने केलेली चुक माझ्या जीववर बेतली.”
हा गोंधळ सुरू असतानाच हंसची बायको तेथे आली अन् डोळ्यात पाणी आणून म्हणाली, “अहो! कितीदा मी तुमच्याशी या वाईट प्रवृत्तीच्या कावळ्या विषयी बोलले ओ! शेवटी असंगाशी संग प्राणाशी गाठ.”


म्हणून तर संत तुकाराम महाराज म्हणतात,
दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी |
देखोनियां दूरी व्हावें तया ||१||
वाईट माणसांची संगत अन् सहवास हा विष्ठे पेक्षाही घाण आणि दुर्गंधीयुक्त आहे.
असा नालायक वृत्तीचा माणूस दिसला की यांच्यापासून आपण स्वत: हून दूर गेलं पाहिजे. एवढंच नाही तर अशा लोकांच्या तोंडाकडे सुध्दा बघितलं न पाहिजे.


आइका हो तुम्हीं मात हे सज्जन |
करूं संघष्टन नये बोलो ||२||
हे संत सज्जनांनो, तुम्हां सर्वांना नम्रतेची विनंती आहे की, अशा हलकट व नालायक लोकांपासून नेहमी दूरच रहा.
दुष्ट- दुर्जनांची संगत ही नेहमीच प्राणघातक असते. अशा लोकांमुळे आपण रसातळाला चाललो आहोत हे लक्षात सुध्दा येत नाही.
त्यामुळे अशा लोकांच्या संगतीत राहणं तर लांबचीच गोष्ट परंतु त्यांच्याशी बोलणं सुध्दा टाळलं पाहिजे.


दुर्जनाचे अंगी अखंड विटाळ |
वाणी रजस्वला स्त्रवे तैसी ||३||
कडू कारलं साखरेत घोळलं काय किंवा तुपात तळलं काय, ते कडू ते कडूच राहणार. या हलकट माणसांचे ही असंच असतं त्यांचा स्वभाव कधीच बदलणारच नाही.
सदोदित वाईट विचारांची घाण यांच्या मेंदूत भरलेली असते आणि ती घाणच नेहमी बाहेर पडते.
अशा लोकांच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द न शब्द म्हणजे स्त्रीयांच्या मासिक पाळीतून होणारा घाण रक्तचा स्त्रावच होय.


दुर्जनाचे भय धरावे त्यापरी |
पिसाळल्यावरी धांवे श्वान ||४||
जसं की पिसाळलेलं कुत्र कधी येऊन चावेल, हे सांगता येत नाही तसं वाईट विचारांची माणसं कधी धोका देतील याचा नेम नाही.
ज्याप्रमाणे पिसाळलेल्या कुत्र्या पासून सावध राहिले पाहिजे तसे समाजातील वाईट आणि विचित्र लोकांपासून दूर राहिले पाहिजे.


दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग |
बोलिलासे त्याग देश त्याचा ||५||
दुर्जनांच्या संगतीत रहाणं म्हणजे जीवांवर बेतण्यासारखंच आहे. त्यामुळे अशा लोकांच्या सहवासात राहण्या ऐवजी, आपण आपलं गाव गाव सोडून दुसरीकडे राहिलेले कधीही आपल्या हिताचेच आहे.


तुका म्हणे किती सांगावे पृथक |
अंग कुंभीपाक दुर्जनाचें ||६||
तुकाराम महाराज म्हणतात, ‘ अहो! संत- सज्जानांनो किती सोप्या भाषेत सांगू म्हणजे तुम्हाला समजेल? सोडा ओ सोडा! अशा ह्या वाईट लोकांच्या संगतीत रहाणं सोडून द्या. यांचा सहवास म्हणजे म्हणजे जीवंतपणी नरक यातनाच होय.’
अन् ह्या नरक यातना फक्त एकट्यासाठीच नाही तर त्याचे भोग कुटुंबियांना सुध्दा भोगावे लागतात.
वाईटांच्या संगतीच्या आगीत सारं कुटुंब जळून नष्ट होतं.
राम कृष्ण हरी 🙏
यशश्री क्लासेस, उस्मानाबाद